Breaking News Updates of Pune

फेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक

पुणे: फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून अनेकदा अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशीच एक घटना पुण्यातील विश्रांतवाडी येथे घडली आहे.

मैत्री केलेल्या व्यक्तीने परदेशातून पाउंड्समध्ये पाठविलेली रक्कम कस्टममधून सोडवून घेण्यासाठी १० लाख रुपये या महिलेकडून उकळले आहेत. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी : फसवणूक झालेल्या महिलेची फेसबुकवरून एका व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीने ‘यूके’मध्ये डॉक्टर असल्याचे भासवत होती. त्यानंतर आरोपीने तक्रारदार यांना ‘यूके’मधून महागडी भेटवस्तू पाठविणार असल्याचे सांगितले.

काही दिवसांत तक्रारदार यांना विमानतळावर सीमा शुल्क विभागातून फोन आला. त्यांना परदेशातून भेटवस्तू व ४५ हजार पौड आल्याचे सांगितले. ते सोडविण्यासाठी तातडीने काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात परदेशी चलन पकडले गेल्यामुळे तुमच्यावर कारवाई होईल, अशी भीती आरोपीच्या साथीदारांनी घातली. त्यानंतर महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर महिलेकडून विविध कारणे सांगून १० लाख ६४ हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रवींद्र कदम अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.