शेतीला आतबटयाची म्हटले जाते; परंतु हिशेबी, तंत्रस्नेही आणि शेतीशास्त्राची जोड देऊन शेती केली, तर ती फायद्याची होते. एवढेच नाही, तर शेतीतून अल्पकाळात लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळते. सासवड तालुक्यातील अनंता पवार यांनी ते दाखवून दिले आहे.

शेतीशास्त्राची ‘पाॅवर’

अंजिराचे आगार पुरंदर तालुक्याच्या अंजीर पट्ट्यातील गाव नसूनही सोमुर्डीचे (ता. पुरंदर) शेतकरी अनंता भिवा उर्फ बाबा पवार यांनी अंजिरामध्ये आपल्या मेहनतीची व शेतीशास्त्राची जणू ‘पाॅवर’च दाखविली.

माळरान विकसीत करून, त्यातील केवळ 24 गुंठ्यात यंदाच्या सरत्या मीठा (उन्हाळी) हंगामाच्या साडेचार महिन्यात 14 टन उत्पादन काढून खर्च वजा जाता, तब्बल 11 लाख रुपयांचा नफा कमविला !

Advertisement

चुकांतून धडा घेत प्रगती

भातपीक उत्पादनातील शासन पुरस्कारार्थी पवार यांनी गोगलवाडीकडे अंजिरशेती पाहून व कृषीतज्ज्ञ स्व. डाॅ.विकास खैरेंकडून प्रेरणा घेऊन 1996 मध्ये प्रथम अंजीरबाग लावली. नंतर प्रादुर्भावाने बाग तोडून वर्षाने पुन्हा 2011 मध्ये 125 अंजीर रोपे लावली.

अभ्यासपूर्वक हंगामाचा बहर धरताना खांदणी, निंबोळीपेंड, शेणखत, संजीवके आवश्यक तेवढेच रासायनिक खते वापरली. संतुलीत फवारण्या, ठिबक सिंचन, बागेची स्वच्छता, वेळेवर खुरपणीसह उत्तम नियोजनाने यंदा बागेत 90 टक्के फळे एक नंबर प्रतीची मिळवली.

स्वतः राबतात

मागील वर्ष टाळेबंदीमुळे उत्पन्न जुजबी ठरले; मात्र यंदा जानेवारीअखेरपासून दिवसाआड फळे तोडणीला कुटुंबीयांसह स्वत: पहाटेपासून चार तास राबतात. मुलगा अमोलच्या मार्फत स्वतःची वाहतूक व्यवस्था, फिक्स आडते यामुळे कमी जागेत यंदा सर्वोच्च नफ्यातील बाग बनली आहे.

Advertisement