ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

एसटीचे ११ हजार कर्मचारी देयकांच्या प्रतीक्षेत

एसटी महामंडळाच्या कामगारांना पगार नसताना निवृत्त कर्मचारीही तीन वर्षांपासून देयकांच्या प्रतीक्षेत आहे. १८० कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी आवश्यक आहे.

शिल्लक रजा, वेतनवाढीतील फरक

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किंवा मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शिल्लक रजा आणि एकतर्फी वेतनवाढीतील फरकाची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून देण्यात आलेली नाही. सुमारे ११ हजार कर्मचारी या अंतिम देयकाच्या प्रतीक्षेत आहे.

व्यवस्थापकीय संचालकांना साकडे

एसटीच्या ताफ्यातून निवृत्त झालेले किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची अंतिम देयके २०१८ सालापासून देण्यात आलेली नाहीत.

कर्मचाऱ्यांची देणी तातडीने आणि एकरकमी देण्यात यावीत, यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदार पोहोरे यांची २१ जूनला भेट घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांची देणी तातडीने देण्याबाबतची मागणी केली.

आंदोलनाची दिशा ठरविणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांच्याशी संघटनेने पत्रव्यवहार केला आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांच्या एकतर्फी वेतनवाढीतील उर्वरित रक्कम देण्यात यावी, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर आणि सेवानिवृत्तांची देणी तातडीने देण्यात यावी; अन्यथा संघटनेच्या चार जुलै रोजी होणाऱ्या मध्यवर्ती कार्यकारिणीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

उपासमारीची वेळ

निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी (उपदान) आणि पीएफचे (भविष्य निर्वाह निधी) पैसे मिळाले आहेत. मात्र, शिल्लक रजेचे पैसे आणि एक एप्रिल २०१६ला दिलेल्या एकतर्फी वेतन वाढीतील फरक अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

You might also like
2 li