महापालिकेने पहिल्यांदा १३२ कोटी रुपये किमतीच्या क्रेडिट नोटचा वापर करून रस्ते विकसन करण्याचे काम हाती घेतले आहे.

क्रेडिट नोट मधून हे रस्ते होणार

शहरातील खराडी भागातील विकास आराखड्यातील आठ रस्ते आणि मुंढवा येथे नदीवर पूल खासगी भागीदार तत्त्वावर (पीपीपी) आणि क्रेडिट नोटच्या मोबदल्यात विकसित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षणे महापालिकेकडून विकसित केले जातात; परंतु यंदा प्रथमच महापालिकेच्या अर्थसंकल्पात क्रेडिट नोटच्या माध्यमातून हे रस्ते विकसित करण्याची तरतूद केली आहे.

Advertisement

त्यानुसार महापालिका प्रशासनाने या क्रेडिट नोटच्या मोबदल्यात खराडी परिसरातील विकास आराखड्यातील सुमारे १०१ कोटी २४ लाख रुपये किमतीचे आठ रस्ते विकसित करण्याची, तसेच मुंढवा ते खराडी भागाला जोडण्यासाठी मुळा-मुठा नदीवर २४ मीटर रुंदीचा २३ कोटी रुपये खर्च करून क्रेडिट नोटच्या मोबदल्यात पूल उभारण्याच्या कामासाठी निविदा मागविल्या आहेत.

खासगी भागीदारीतून रस्ते, पूल

महापालिकेने यापूर्वी २०११-१२ मध्ये मुंढवा आणि खराडी येथील रस्ते क्रेडिट नोटच्या माध्यमातून विकसित केले होते.

त्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासगी भागीदाराच्या तत्त्वावर आणि क्रेडिट नोटच्या मोबदल्यात रस्ते विकसन आणि पूल उभारण्याच्या कामाची निविदा काढली आहे.

Advertisement

२१ रस्ते विकसनाची तरतूद

“पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात खासगी भागीदारी तत्त्वावर आणि क्रेडिट नोटच्या माध्यमातून शहरातील २१ रस्ते विकसनाची तरतूद केली आहे.

त्याबाबतचे धोरणही यापूर्वीच निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात आठ रस्ते आणि एका पुलाची निविदा काढली आहे,” अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

 

Advertisement