Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

चारशे जणांना 16 कोटींना गंडा; सनदी लेखापालाला अटक

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर १८ ते २२ टक्के परताव्याच्या आमिष दाखवून, चारशेहून अधिक नागरिकांची १६ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सनदी लेखापरीक्षकाला (सीए) अटक केली.

‘एमपीआयडी’ (महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंध संरक्षण कायदा) न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी सनदी लेखापालाला दोन आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

कैलास राधाकिसन मुंदडा (वय ४२, रा. सिंहगड रस्ता) असे या सनदी लेखापालाचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महेशकुमार भगवानदास लोहिया (३१, रा. सिंहगड रस्ता) हा न्यायालयीन कोठडीत असून, अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत शुक्रवार पेठ परिसरात घडला.

Advertisement

गुंतवणुकीचा दहा लाखांचा धनादेश स्वतःच्या बँक खात्यावर

फिर्यादींनी शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दिलेला दहा लाख रुपयांचा धनादेश महेशकुमारने स्वत:च्या बँक खात्यात जमा केला.

फिर्यादींना खात्याची खोटी माहिती सांगून बनावट नफा-तोटा पत्रके तयार करून ती ई-मेलद्वारे पाठवून; तसेच मोबाइलवर खोटे संदेश पाठवून त्यांची दिशाभूल केली.

आरोपींनी संगनमताने अशा प्रकारे चारशेहून अधिक नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्यात आरोपी मुंदडा याचाही सहभाग असल्याने पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.

Advertisement

प्राप्तिकर भरायला लावला

कैलास मुंदडाने गुंतवणूकदारांना फायदा होण्याचे आमिष दाखवून महेशकुमारमार्फत गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या रकमेतून सुमारे एक कोटी १० लाख ६२ हजार रुपये मुंदडाने महेशकुमारकडून स्वीकारल्याचे फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये निष्पन्न झाले आहे.

फसवणूक झालेले काही गुंतवणूकदार सीए असलेल्या मुंदडाचे ग्राहक आहेत. महेशकुमारने या गुंतवणूकदारांना दिलेल्या खोट्या शेअर्स ट्रेडिंग स्टेटमेंटमध्ये फायदा झाल्याचे सांगून मुंदडाने गुंतवणूकदारांना संशय येऊ नये, यासाठी त्यांना या फायद्यावर प्राप्तिकर भरण्यास भाग पाडले आहे.

Advertisement
Leave a comment