रेवदंडा बंदरातून निघालेले एमव्ही मंगलम बार्ज गुरुवारी पहाटे बुडाले. तटरक्षक दलाने मदत व बचावकार्य मोहीम राबवून बार्जवरील १६ खलाशांची सुखरूप सुटका केली. हे बार्ज विशाखापट्टणम येथून लोखंडी गोळ्यांचा कच्चा माल घेऊन आले होते.

मुंबई बंदरातून १५ जूनला ते रेवदंडाजवळील जेएसडब्ल्यू कंपनीकडे निघाले. बुधवारी संध्याकाळी रेवदंडा समुद्रकिनाऱ्यापासून साधारण दीड किमी अंतरावर समुद्रात असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. ते किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न खलाशांनी केला, मात्र बार्ज कलंडण्यास सुरुवात झाली.

बार्ज बुडण्याची शक्यता दिसू लागल्याने खलाशी व कप्तानाने तटरक्षक दलाकडे गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मदत मागितली. अपघाताची माहिती मिळताच दिघी येथील तटरक्षक दलाचे सुभद्रा कुमारी चौहान हे जहाज घटनास्थळी रवाना करण्यात आले.

Advertisement

तर दमण येथून दोन चेतक हेलिकॉप्टर मदत व बचाव कार्यासाठी रेवदंडा येथे पाठवण्यात आली. पाऊस व वाऱ्याचा जोर असल्याने समुद्र खवळलेला होता.

त्यामुळे मदत व बचाव कार्य करणे आव्हानात्मक होते. सकाळी दहाच्या सुमारास तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांनी बार्जवर अडकून पडलेल्या सर्व १६ खलाशांची सुटका केली.

तब्बल साडेतीन तास हे बचावकार्य सुरू होते. या सर्वांना नंतर रेवदंडा येथे आणण्यात आले. रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सर्वांना रवाना करण्यात आले. या मदत व बचाव कार्यादरम्यान मेरीटाईम बोर्ड आणि पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Advertisement