जिल्ह्याच्या विकासाच्या नवीन प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. विकास आराखड्यात १७० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असली, तरी जिल्हा परिषदेला मात्र कोरोनामुळे विकासकामांच्या निधीत कपात करावी लागली आहे.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत गेल्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) विकासकामांवर झालेल्या खर्चास आणि चालू आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आदी होते.

Advertisement

६९५ कोटींचा आराखडा

पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १७० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मार्च २०२० मध्ये तयार केलेला ६९५ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा पुढेही कायम ठेवण्यात आला आहे.

या ६९५ कोटी रुपयांचा नवीन प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शिल्लक निधी विकासकामांसाठी

मागील आर्थिक वर्षात (२०२०-२१) जिल्ह्याचा ५२३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता; मात्र कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी यापैकी ३० टक्के निधी राखीव ठेवण्यात आला होता.

Advertisement

परिणामी ऐनवेळी या आराखड्यातील निधीच्या रकमेत ३० टक्क्यांनी कपात करावी लागली होती; परंतु आर्थिक वर्षाच्या शेवटी शिल्लक निधी हा वार्षिक योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांसाठी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला होता.

गेल्या आर्थिक वर्षाचा पुणे जिल्ह्याचा मूळ विकास आराखडा हा ५२३ कोटी रुपयांचा होताच; परंतु वर्षाच्या सरते शेवटी मिळालेल्या निधीमुळे तो ६८५ रुपयांचा झाला होता.

 

Advertisement