इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या शुल्कात २५ टक्के कपात

इंग्रजी माध्यमांच्या शाळा अवाजवी फी आकारतात. पालकांची अडवणूक करतात. फीसाठी पालकांना कोंडून ठेवण्याचा प्रकारही घडला आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संघटनेनं शैक्षणिक शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.

पालक गमावलेल्यांना मोफत शिक्षण

कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचाही निर्णय या संघटनेने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण इंग्रजी शाळांपैकी 80 टक्के शाळा या संघटनेशी संलग्न आहेत.

या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मुंबई, रायगड आणि ठाणे विभागात या संघटनेशी संबंधित 1200 इंग्रजी शाळा आहेत.

पालकांच्या मागणीची दखल

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाची महामारी सुरू असल्याने या काळात नोकरी आणि व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन शाळांनी शुल्क कमी करावे, अशी मागणी सातत्याने पालक संघटनांकडून होत होती. त्याची दखल घेत महाराष्ट्रात 18 हजार सभासद असलेल्या मेस्टाची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शाळांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप

हा निर्णय घेतानाही शाळांनी आपल्या अडचणी मांडल्या आहेत. कोरोनामुळे पालकांबरोबरच इंग्रजी शाळाही अडचणीत सापडल्या आहेत. वीजबील आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत.

त्यामुळे बँका इमारती जप्त करत आहेत. ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. काही उपद्रवी राजकारणी लोक पालकांना पुढे करून इंग्रजी शाळांना लक्ष्य करीत आहेत.

शाळेत गोंधळ घालून शाळांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे, असे मत संघटनेच्या सदस्यांनी मांडले.

ज्या पालंकाचे उद्योग व्यवसाय सुरळीत चालू आहेत, जे सरकारी अथवा निमसरकारी नोकरीला आहेत, त्यांचा पगार होत आहे त्या पालकांनी शाळांची फी भरायला हवी ते पालकही ‘वेट अँड वॉच ची’ भूमिका घेऊन फी भरण्यासाठी नकार देत आहेत. या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी या बैठकीत शाळांनी केली.