नोकरीच्या आमिषाने 51 लाखांना गंडा

कष्टममध्ये आपल्या ओळखी असल्याचं सांगून, नोकरीचं आमिष दाखवून तिघांना ५१ लाख लोकांना गंडा घालणा-या तोतया पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.

पोलिसांचे गणवेश व गाड्या जप्त

फरासखाना पोलिसांनी तोतया पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४३, रा. काळेपडळ हडपसर) याला अटक केली आहे.

साथीदार महिला सुलोचना दादू सोनवणे (वय ३७, रा. टिंगरेनगर) हिच्यासह दोघांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दीपक मोहनलाल मुंदडा (वय ५१, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी शिंदे याच्या ताब्यातून पाच ते सहा पोलिसांचे गणवेश व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ओळख वाढवून गैरफायदा

फिर्यादी दीपक मुंदडा हे गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय करतात. २०१४ मध्ये गणेशोत्सव काळात मूर्ती खरेदी करण्यासाठी शिंदे हा त्यांच्याकडे आला होता. त्या वेळी त्याने तो मुंबई पोलिस दलात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यातूनच पुढे ओळख निर्माण झाली.

दरम्यान शिंदे याने फिर्यादींना कस्टम ऑफिस येथील काही अधिकारी आपल्या ओळखीचे असल्याचे सांगितले. तेथे मी तुमच्या मुलांना नोकरी लावू देतो, असेही आमिष दाखवले. मुंदडा यांना तो पोलिस असल्याचे सांगत असल्यामुळे सुरुवातीला विश्वास वाटला.

तसेच तो जेव्हा जेव्हा मुंदडा यांना भेटला, त्या वेळी त्याच्या गाडीत पोलिसांचा गणवेश होता, तर दुसरी संशयित आरोपी महिला सुलोचना सोनवणे ही कस्टम विभागात अधिकारी असल्याचे शिंदे सांगत असे.

पैसे घेऊन फोन केला बंद

मुंदडा यांना विश्वास वाटावा म्हणून त्याने ज्या मुलांना नोकरी लावणार आहे, त्यांना साहित्य पाठवून दिले. तसेच त्यांचे मुंबई येथे नेऊन एका रुग्णालयात मेडिकलदेखील केले.

२०१७ मध्ये शिंदे याने मुंदडा व त्यांच्या नात्यातील इतर तरुणांकडून क्लार्कपदासाठी प्रत्येकी १५ लाख व सुप्रिडेंट पदासाठी २५ लाख रुपये सांगून वेळोवेळी एकूण ५१ लाख १७ हजार रुपये घेतले.

मुंदडा यांनी त्याच्याकडे मुलांच्या नोकरीबाबात विचारणा केली, तेव्हा त्याने आपला अपघात झाल्याचे सांगून काही दिवस फोन बंद केला. तसेच कस्टमचे ऑफिस शिफ्ट होत असून नियुक्तीपत्र येण्यास काही दिवस लागणार असल्याचे सांगितले.

याच कालावधीत फिर्यादींचा मित्र चंद्रकांत चव्हाण यांच्याकडूनदेखील त्याने त्यांच्या मुलाला नोकरी लावतो, असे सांगून पैसे घेतले आहेत.

असा अडकला जाळ्यात

मोठी रक्कम उकळल्यानंतर राहिलेले पैसे घेण्यासाठी तो बनावट नियुक्तीपत्र घेऊन आला होता. काही दिवस फोन बंद केल्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. काही वेळातच तो एका चारचाकी गाडीतून आला.

या वेळीदेखील त्याने गणवेश परिधान करून डोक्याला खाकी टोपी घातली होती; मात्र त्याची चूक पोलिस मित्राच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्याने गणवेश पोलिस उपनिरीक्षकाचा परिधान केला होता.

खांद्याला दोन स्टारदेखील लावले होते; मात्र नेमप्लेट सहाय्यक पोलिस निरीक्षकाची लावली होती. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच तोतया पोलिस उपनिरीक्षकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच प्रसंगावधान राखत त्याला पकडले.