कोरोनाचा फटका एसटीला बसला आहे. एसटीची चाके रुतली आहेत. कोरोनाची भीती अजून मनात कायम असल्याने एसटीला प्रवाशीही तेवढे मिळत नाहीत. त्यामुळे दररोज तोटा वाढत आहे.

राज्य सरकारने सहाशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली असली, तरी अजून राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ९७ हजार कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. दर महिन्याला ७ तारखेला होणारे वेतन अजून मिळाले नसल्याने कर्मचारी चिंतातूर झाले आहेत.

कर्मचा-यांपुढे घर कसे चालवायचे याची चिंता

राज्य सरकारने नुकतेच एसटीसाठी ६०० कोटी दिले असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र तो निधी अद्याप एसटीकडे वर्ग झाला नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लवकरात लवकर वेतन मिळावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहे.

Advertisement

रक्कम वर्ग करण्याची मागणी

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, की एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. त्यात एक दिवस जरी वेतन उशिरा झाले तरी कर्मचाऱ्यांच्या संसाराचे बजेट कोलमडते. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली रक्कम तातडीने एसटीच्या खात्यात वर्ग करावी.

 

Advertisement