भर दुपारी चिखलीत निर्घूण खून

मित्रांना घेऊन मद्यपान करीत असल्यानं एकाला घर सोडून जाण्यास सांगितलं, त्याचा राग धरून एक वर्षानंतर भर दिवसा एकाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून, एक अल्पवयीन आहे.

हे आहेत आरोपी

घर सोडून जाण्यास कारणीभूत असल्याच्या गैरसमजातून चिखलीत भरदिवसा तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर (वय ३८, रा. परशुराम चौक, चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. आकाश उर्फ़ मकसूद विजय जाधव (वय १९, रा. कुदळवाडी,चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल क्षीरसागर हिने फिर्याद दिली आहे.

कट रचून खून

एक वर्षापूर्वी आकाश जाधव हा कानिफनाथ यांच्या घराशेजारी राहण्यास होता. तो मित्रांना घेऊन घरात दारू प्यायचा.

त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्याला घर सोडून जाण्यास सांगितले होते; मात्र आपल्याला घर सोडून जाण्यास कानिफनाथ हेच कारणीभूत आहेत, असा जाधवचा गैरसमज होता.

त्यातून त्याने कानिफनाथ यांचा खून करण्याचा कट रचला. अल्पवयीन मुलाने कानिफनाथ यांना फोन करून साने चौकातील शुभम हॉटेलजवळ मांडवाच्या कामानिमित्त बोलवून घेतले.

कानिफनाथ तेथे गेले असता जाधव याने कानिफनाथ यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला. हा प्रकार दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घडला.