चार महिन्याच्या बाळाच्या हृदयातील बुजविले छिद्र

चार महिन्याच्या बाळाची वाढ खुंटली होती. त्याला अन्य त्रास होत होते. त्याच्या हृदयात छिद्र असल्याचे आढळले.

त्यामुळे पालकांचा धीर खचला; परंतु येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाच्या हृदयातील छिद्र (व्हीएसडी क्लोजर) बुजविण्यासाठी हायब्रीड शस्त्रक्रिया केली. राज्यात एवढ्या लहान बाळावर पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

दहाव्या दिवशीच छिद्राचे निदान

सह्याद्री हॉस्पिटल्सचे हृदय शल्यविशारद डॉ. राजेश कौशिश आणि बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगांवकर म्हणाले, ‘‘या चार महिने व पंधरा दिवसांच्या बाळाला आपल्या आयुष्याच्या दहाव्या दिवशी हृदयामध्ये १० मिलीमीटर छिद्र असल्याचे निदान झाले.

त्यामुळे त्याला खोकला आणि सर्दीचा त्रास होत होता. या बाळाचे वजन ४.२ किलो होते. या आजारामुळे त्याचे वजन वाढत नव्हते.’’

गुंतागुंत टाळण्यासाठी हायब्रीड शस्त्रक्रिया

हृदयातील हे छिद्र बुजविणे गरजेचे होते. त्यासाठी आम्ही हायब्रीड तंत्राची निवड केली. त्यातून हृदयापर्यंत पोहचण्यासाठी प्रभावी प्रक्रिया केली जाते. पल्मनरी बायपासची गरज पडत नाही आणि इतर गुंतागुंतही टाळता येते.

हृदय शल्यविशारद डॉ. कौशिश यांनी स्टर्नोटॉमी ही प्रक्रिया केली. त्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी हृदयाच्या उजव्या कप्प्यापर्यंत पोहचता आले. त्यानंतरची उर्वरित प्रक्रिया ही गुंतागुंतीची होती.

कारण त्यामध्ये हे छिद्र बुजविण्यासाठी १२ मिलीमीटर मस्क्युलर व्हीएसडी उपकरण रोपित करण्यात आले. डॉ. सुगांवकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीमतर्फे या बालकावर ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.