Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

गुन्हेगारासोबतचा वाढदिवस पोलिस अधिका-याच्या अंगलट

मुंबईः गेल्या काही वर्षांपासून पोसिसांवर ताण असतानाच या यंत्रणेला कीड लागली, की काय असे वाटावे अशा घटना घडत आहेत. गुन्हेगारांशी पोलिस अधिका-यांचे साटेलोटे असल्याचा जनतेतला समज दृढ होत आहे.

गुन्हेगाराच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा करणे एका पोलिस निरीक्षकाला चांगलेच अंगलट आले असून, त्याची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.

संतापाची लाट

परमबीर सिंह, सचिन वाझे प्रकरणांमुळे मुंबई पोलिस अडचणीत आले असतानाच एक अधिकारी सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट पसरली.

Advertisement

या प्रकाराची गंभीर दखल घेत या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महेंद्र नेर्लेकर असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे

कुख्यात गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा कापला केक

अनेक गंभीर गुन्हे करून जोगेश्वरी- गोरेगाव परिसरात दहशत निर्माण करू पाहणारा सराईत गुन्हेगार आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या दानिश सय्यद याचा वाढदिवस नेर्लेकर यांनी साजरा केला.

काही दिवसांपूर्वी नेर्लेकर हे दानिशचे वास्तव्य असलेल्या जोगेश्वरी पूर्वेकडील एमएमआरडीए कॉलनीत गेले होते. या कॉलनीतील कार्यालयात दानिशच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेर्लेकर आणि दानिश एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत.

Advertisement

हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन नेर्लेकर यांची जोगेश्वरी पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात तात्काळ बदली केली.

अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद

दानिशवर गोरेगाव पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे), कलम १४८ ( प्राणघातक हत्यारासह दंगा करणे), कलम ३२४ (घातक शस्त्रांनी किंवा साधनांनी दुखापत करणे),

कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही जोगेश्वरी पोलिस ठाण्यात त्याच्या नावे दाखल आहे.

Advertisement

याआधीही पोलिस अडचणीत

गेल्या वर्षी जूनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना मालवणी पोलिसांनी निर्बंध झुगारून वाढदिवस साजरा केला होता. तो व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. या सेलिब्रेशनमध्येही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग होता.

त्यापूर्वी जुलै २०१९मध्ये भांडुप पोलिस अशाच वाढदिवस पार्टीमुळे अडचणीत आले होते. खंडणी, मारहाणीचे गुन्हे असलेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच पोलिसांवर त्यावेळी निलंबनाची कारवाई झाली होती.

Advertisement
Leave a comment