ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे, अशा ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून दुर्घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये, यासाठी ही भिंत बांधणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे.

आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक घेतली. राज्याचे मुख्य सचिव आपत्कालिन विभागाचे अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे एकाच गाडीतून वर्षा बंगल्यावर पोहोचले.

१७१ किलोमीटरटी भिंत

पाच जिल्ह्यांच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा दुर्घटनाग्रस्त भागात पाहणी दौरा

मुख्यमंत्र्यांनी सलग तीन दिवस पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तुफान पावसाने हाहाकार माजवल्याने राज्याच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

चिपळूण, सातारा इथेही दरडी कोसळल्या. मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि चिपळूणचा दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयनानगरला जात होते; मात्र तुफान पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होऊ शकत नसल्याने, मुख्यमंत्री परत पुण्याला आले. तिथून ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर आपत्कालिन बैठक घेतली.