Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

सर्जा राजाचा उभारला पुतळा

बैल हा केवळ शेती कामापुरता उपयुक्त पशू नाही. त्याचं शेतकरी कुटुंबाशी भावनिक नातं जडलेलं असतं. तो घरातील एक सदस्य असतो. घरातील सदस्याच्या निधनाचं जसं शेतक-याला दुःख होतं, तसंच दुःख बैलाच्या जाण्यानं ही होतं.

त्यामुळं तर बैलाचे अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसारखे कार्यक्रम झाल्याचं ऐकायला, वाचायला मिळतं. एका शेतक-यानं तर बैलाची आठवण कायम राहावी, म्हणून चक्का त्याचा पुतळा बनवून त्याची प्रतिष्ठापना केली आहे.

मुक्या प्राण्याशी जोडलेलं नातं

शेतकऱ्याच्या जीवनात आणि भावविस्वात बैलजोडीला महत्वाचं स्थान असतं. शेतकऱ्याचं भावविश्व मुक्या प्राण्यांशी जोडलेलं असतं. पुण्यातील खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील शेतकरी शंकर पाटोळे यांच्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाला.

बैलाच्या मृत्यूननंतर पाटोळे यांनी दशक्रियाविधी घातला. एवढचं नव्हे, तर बैलाची आठवण कायम राहावी यासाठी घरासमोर बैलाचा पुतळाही उभारला आहे.

28 वर्षांपासून कुटुंबाचा भाग

पाटोळे यांच्या घरच्याच गाईला 28 वर्षांपूर्वी गो-हा झाला होता, या गो-ह्याचे नाव त्यांनी शेलार असे ठेवले. हा गो-हा त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य झाला होता; परंतु पंधरा दिवसांपूर्वी या बैलाचा मृत्यू झाल्यानंतर पाटोळे कुटुंबीयांना खूप दुःख झालं.

पाटोळे कुटुंबीयांनी एकत्र येत आपल्या बैलाची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी त्यांनी आपल्या घरासमोर लाडक्या शेलार या बैलाचा पुतळा उभारला आहे.

पाटोळे कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे बळीराजा शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा राजावर किती प्रेम करतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a comment