बीड: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीच्या वेळी गोंधळ घालणा-या तसेच घोषणा देणा-या तरुणाचा संभाजी ब्रिगेच्या वतीने सत्करा करण्यात आला.
हा तरुण कोण?
पवार यांच्या बीड दौऱ्यावेळी झालेल्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचं नाव हनुमान फफाळ असं आहे. त्यानं पवार यांची बैठक सुरू असलेल्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली होती. खणखणीत आवाजात हनुमान फफाळ बराचवेळ घोषणाबाजी करत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होतं.
काय झालं त्या दिवशी?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरीप पेरणीसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
त्यावेळी हनुमान फफाळ या तरुणानं जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत अजित पवार यांची भेट घेण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याला रोखलं.
पोलिसांनी संबंधित तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून बाहेर काढलं. त्या वेळी या तरुणानं घोषणाबाजीला सुरुवात केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा या तरुणानं दिल्या.