कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घ्यायला निघालेल्या तरुणीचा विचित्र अपघातात मृत्यू झाला, तर तरुण जखमी झाला. कोंढव्यातील कोंढव्यातील ‘एनआयबीएम’ चौकाजवळ हा अपघात झाला.

असा झाला अपघात

रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीवरून मागून जाणाऱ्या तरुणानेही ब्रेक लावला. त्यात त्याची दुचाकी घसरून, त्यावरील तरुण आणि तरुणी रस्त्यावर पडले. त्या वेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील चारचाकीचे चाक तरुणीच्या पोटावरून गेले.

त्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. गायत्री गोविंद इथापे (वय १८, मूळ रा. सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश शंकर मांढरे (वय २०, रा. वारजे) याने फिर्याद दिली आहे. गायत्री डॉक्टरकीचे शिक्षण घेत होती, असे प्रथमेशने सांगितले.

Advertisement

दोघेही घेत होते शिक्षण

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश आणि गायत्री हे दोघे मित्र आहेत. तरुणी एका आयुर्वेदिक वैद्यकीय महविद्यालयात शिक्षण घेत होती; तर प्रथमेशचे इंजिनीअरिंगचे शिक्षण सुरू आहे.

ते दोघे २९ जूनला दुपारी पावणेदोनच्या सुमारास मोपेडवरून उंड्री परिसरात गेले होते. तिथून ते मुंढव्याला चालले होते. प्रथमेश गाडी चालवित होता. त्या वेळी एनआयबीएम चौकाच्या अलीकडे समोरील रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबला.

त्यामुळे प्रथमेशनेही अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरून ते दोघेही रस्त्यावर पडले. गायत्री दूर फेकली गेली.

Advertisement

त्याचवेळी एनआयबीएम चौकातून उंड्रीच्या दिशेला भरधाव वेगात चाललेल्या चारचाकीचे चाक गायत्रीच्या पोटावरून गेले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

 

Advertisement