गुलशन कुमार हत्या प्रकरणातील आरोपीची शिक्षा कायम

टी सिरीज कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यात आरोपीला सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

सहानुभूतीने विचार करण्यास नकार

सत्र न्यायालयाने 29 एप्रिल 2002 मध्ये रौफ मर्चंटला हत्या, हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान आदी आरोपांत दोषी ठरविले होते. याविरोधात त्याने केलेल्या अपील याचिकेवर आज न्या साधना जाधव आणि न्या नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली.

आरोपीची गुन्हेगारी पाश्वभूमी आहे आणि तो एकदा फरारही झाला होता. त्यामुळे त्याचा सहानुभूतीने विचार होऊ शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. रौफला कलम 392 आणि 397 च्या आरोपातून न्यायालयाने मुक्त केले आहे.

न्यायालयाने अन्य आरोपी निर्माता रमेश तौरानी यांच्या विरोधात राज्य सरकारने केलेले अपील नामंजूर केले आहे. त्यामुळे तौरानी यांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक कारणातून गुलशन कुमार यांची 12 औगस्ट 1997 रोजी जुहूमध्ये हत्या झाली होती.