महिला डाॅक्टराच्या खोलीत छुपे कॅमेरे लावल्याप्रकरणी बडा डाॅक्टरच निघाला आरोपी

पुण्यातील भारती विद्यापीठातील एका प्रशिक्षणार्थी महिला डाॅक्टराच्या निवासस्थानातील बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमरे लावल्याप्रकरणाचा सूत्रधार शोधण्यात पोलिसांना आठ दिवसांत यश आले आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे यांनी या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले होते. अखेर पोलिसांनी एका बड्या डाॅक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत.

डाॅक्टरला दोन दिवसांची पोलिस कोठडी

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूममध्ये स्पाय कॅमेरे लावल्याप्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. सुजीत जगताप (वय ४२) असे त्याचे नाव आहे.

डॉक्टरनेच हे छुपे कॅमेरे लावल्याचे उघड झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने डॉ. सुजीत जगतापला दोन दिवसांची पोलिस कोठाडी सुनावली आहे.

असे झाले उघड

डॉक्टरने हा छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवररून मागवला असल्याचं उघड झाले आहे. 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या स्टाफ क्वार्टरमधील बेडररूम आणि बाथरुममध्ये हे छुपे कॅमेरे सापडले.

पुण्यातील भारती विद्यापीठाच्या स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पीडिता डाॅक्टर सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या.

सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना रूममधील बल्ब लागत नसल्याचे आढळळे.

त्यांनी वीजतंत्री कामगाराला बोलावले आणि बल्ब काढला, तेव्हा त्यात छुपा कॅमेरा आढळला. त्यानंतर आणखी तपासणी केली असता बाथरूम आणि बेडरूममध्ये कॅमेरे आढळले. त्यानंतर संबंधित पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

जामीन न मिळण्याची दक्षता घ्या

आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.