उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा संसर्ग टळला नसल्याने बाहेर फिरू नका, असे सांगूनही पर्यटक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळं आज मुळशी, जुन्नर, लोणावळा आदी ठिकाणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. संबंधितांकडून दंडवसुली करण्यात आली.

मुळशी तालुक्यात नाकाबंदी

मुळशी तालुक्यात पर्यटनास आज आलेल्या ५० जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तहसीलदार अभय चव्हाण यांनी मुळशीतील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटनास बंदी घातली आहे.

याबाबत कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे आदेश पौड पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार मुळशी तालुक्यातील भूगाव, घोटावडे फाटा, पौड, माले, मुठा खिंड या ठिकाणी पौड पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

Advertisement

पौड पोलिसांकडून साठ पर्यटकांवर कारवाई

पौड पोलिसांनी साठहून अधिक पर्यटकांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपये दंड वसूल केला. पर्यटनास बंदी असतानाही शहर पोलिसांचा डोळा चुकवून मुळशीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सख्या लक्षात घेऊन पौड पोलिसांनी आज कडक कारवाईचे धोरण स्वीकारले, वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवासा रस्त्यावर मुठा घाटात उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सुधीर होळकर, नितीन गार्डी, जय पवार, गणेश साळुंके यांनी तर कोलाड रस्त्यावर पौड येथील शासकीय गोदामासमोर सहाय्यक निरीक्षक विनायक देवकर, तुषार भोईटे यांच्या पथकाने तपासणी नाके उभारून पर्यटकांवर कारवाई केली. आज दिवसभरात सुमारे दोनशेहून अधिक चारचाकी वाहने परतवून लावली.

हाैशी पर्यटकांना आवरणे अवघड

ऐतिहासिक नाणेघाट व दाऱ्या घाटाकडे जाणाऱ्या हौशी पर्यटकांना जुन्नर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. नाकाबंदीत ५६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

सुट्टीच्या दिवशी नाणेघाट व दाऱ्याघाटाकडे पर्यटकांचा ओढा वाहू लागला आहे. त्यांना पायबंद घालण्यासठी जुन्नर-आपटाळे मार्गावर निरगुडेजवळ पोलिसांनी सकाळपासून वाहनांची तपासणी सुरू केली होती. यासाठी दोन अधिकारी व आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

Advertisement

या कारवाईत मुखपट्टीविना १६ तर विनाकारण फिरणारे ४० अशा एकूण ५६ जणांकडून २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच त्यांना येथूनच माघारी पाठविण्यात आले.

 

Advertisement