ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मेधा पाटकर यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक

सेंच्युरी मिलमधील एक हजाराहून अधिक कामगारांना ऐच्छिक सेवानिवृत्तीची सक्ती करण्यात आल्याच्या निषेधार्थ जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) आणि श्रमिक जनता संघासह अनेक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर आले.

त्यांनी आंदोलन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह आंदोलकांना अटक करण्यात आली.

सेंचुरी मिलमध्ये आंदोलन

मेधा पाटकर यांच्यासह शेकडो कामगारांनी मुंबईतील बिर्ला भवन जवळील सेंच्युरी मिल येथे आंदोलन केलं. आंदोलकांना अटक करून दादर पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या अटकेचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे.

नोटिशीविरोधात आंदोलन

कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले, “बेकायदेशीर ऐच्छिक सेवानिवृत्तीची सक्ती करणाऱ्या नोटिसीविरोधात जाब मागण्यासाठी श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर, सरचिटणीस जगदीश खैरालिया यांच्यासह शेकडो कर्मचारी मुंबईतील सेंच्युरी मुख्यालयासमोर आंदोलन करत होते.

या वेळी पोलिसांनी पाटकर यांच्यासह आंदोलकांना अटक केली आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. कामगार संघटना संयुक्त कृति समिती पाटकर यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहे.

मालकांना अटक करण्याची हिंमत आहे का ?

महाराष्ट्र सरकार सेंच्युरी मिल मालकांना कामगार विरोधी कृत्यासाठी अटक करण्याची हिंमत दाखविणार का? मुंबई पोलिसांनी तारतम्य गमावले आहे काय?” असे सवालही विश्वास उटगी यांनी केले.

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयने म्हटले आहे, की सेंच्युरी मिलचे हजारो कामगार आपल्यावरील अन्यायाविरोधात मागील 44 महिन्यांहूनही अधिक काळ शांततापूर्ण रीतीने संघर्ष करत आहेत.

कंपनीने नुकत्याच केलेल्या एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर सक्तीची व्हीआरएस घेण्याचं बेकायदेशीर धोरण आणलं गेलं.

यांना अटक

अटक झालेल्यांमध्ये अन्य अनेक महिला-पुरुष कर्मचाऱ्यांसह श्याम बधाने, संजय चौहान, हेमंत गोसावी हे सेंच्युरी मिल्समधील कर्मचारी कार्यकर्ते तसेच मेधा पाटकर (राष्ट्रीय संयोजक, एनएपीएम) आणि जगदीश खैरलिया (सचिव, श्रमिक जनता संघ) यांचा समावेश आहे.

 

You might also like
2 li