पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाहणी दाै-याच्या वेळी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पर्यावरण मंत्री असताना तुम्ही काय केले, अशी थेट विचारणाच नागरिकांनी केली. आदित्य यांचा हिरमोड झाला; परंतु त्यांनी प्रश्न ऐकून घेतले आणि सोडविण्याचे आश्वासनही दिले.

तुम्ही नुसतेच पर्यावरणमंत्री

आदित्य ठाकरे यांनी चिपळूणमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांना चिपळूणमधील नागरिकांनी वाशिष्टी नदीतील गाळाबाबत प्रश्न विचारला.

Advertisement

त्या प्रश्नाला आदित्य यांनी उत्तर दिलं आहे; मात्र त्या वेळी त्यांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. नुसतेच तुम्ही पर्यावरणमंत्री; पण इकडे काय सुरू आहे हे पाहायला तुम्ही येतच नाही. आमचे पूल वाहून गेले आहेत. नदीत किती गाळ साचलाय.

पर्यावरणमंत्री असून तुम्ही काय केलं? असा सवाल चिपळूणमधील एका नागरिकाने आदित्य यांना विचारला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनीही शांतपणे उत्तर दिलं.

मला आमदारांनी त्याबाबत सांगितलं आहे. मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरच ते काम होऊन जाईल. मी आता येत राहील, असं उत्तर देत आदित्य तिथून पुढे निघाले.

Advertisement

‘हा पाहणी नाही तर मदत दौरा’

चिपळूण आणि महाड या दोन्ही तालुक्यात जात आहे. आता पाहणी नाही तर मदतीचं काम सुरू झालं आहे. पहिल्या दिवसांत आमचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था आदींनी मदतीत खूप काम केलं आहे.

आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. अजूनही काही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे; पण आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मदत सुरू करण्यात आली आहे.

आम्ही शिवसेना म्हणून जी मदत करायची आहे ती करत आहोत. अन्य पक्षही मदत करत आहेत, असं आदित्य म्हणाले.

Advertisement

‘पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत’

ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेवायची आहे. महाराष्ट्रात ते चित्र पाहायला मिळत आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठीच काही करत आहोत, असं आदित्य या वेळी म्हणाले.

पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल; मात्र आता सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी, घरगुती सामान, स्थलांतर आदी गोष्टी आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

 

Advertisement