मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) गवय्येगिरीच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर खवय्येगिरी करताना दिसणार आहेत.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या सुप्रसिद्ध कार्यक्रमात अमृता फडणवीस दिसणार आहेत. तसेच या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

यावेळी प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने देवेंद्र फडणवीस यांना आई सुगरण की बायको? असा प्रश्न विचारला होता . मात्र, देवेंद्र फडणवीस या प्रश्नाने बुचकळ्यात पडले होते.

Advertisement

या कार्यक्रमात महाराजांच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुगली टाकली. “माझी आई आणि बायको जेवण बनवतात, आणि विचारतात, कोणाचं चांगलं झालंय, तेव्हा पंचाईत होते.

तर तुम्ही मला सांगा, की तुमच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, आणि अमृताताईंच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, मुळात आवडतो की नाही?” असे प्रशांत दामलेंनी विचार होते.

त्याचसोबत अमृता फडणवीस यांना विचारले की देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असे उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असे उत्तर त्यांनी दिले आहे.

Advertisement

मा. देवेंद्र फडणवीस यांच्या ग्लॅमरस पत्नी, सजग आई, प्रेमळ सून, बँकर, निर्मात्या, गायिका, टेबल टेनिस चॅम्पियन, परफॉर्मर अशी अमृता यांची लांबलचक ओळख सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने करुन दिली होती. हा भाग आज (बुधवारी) रात्री (९.३०) वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.