पुणे – शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे.

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. मात्र, यंदा दसरा मेळावा कोण घेणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

दरम्यान, आज संध्याकाळी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे हे दोघेही दसरा मेळावा घेणार आहेत. दसरा मेळाव्यापूर्वी काही टीझर लाँच झाले असून सध्या दोन्ही गटांचे हे टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंनी वांद्रा कुर्ला संकुल येथील मैदानावर सायंकाळी पाच वाजता शिंदे गटाचा दसरा मेळावा होईल असं जाहीर केलं आहे. तर, दुसरीकडे त्याच वेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील दसरा मेळावा शिवाजी पार्क मध्ये होणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर जोरदार तयारी सुरू असून संध्याकाळी किती गर्दी होणार? आणि दोन्ही नेते भाषणांमध्ये काय बोलणार? या दोन प्रमुख प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे.

आणि याचसंदर्भातून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी या दोन्ही राजकीय नेत्यांना एक आवाहन केलं आहे. अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सल्ला दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार…

“दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांनी समंजस भूमिका घ्यावी. जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा अधिकार आहे.

पण कुणाच्याहीबद्दल अनादराची भावना न दाखवता जी महाराष्ट्राची परंपरा आहे, तिला कुठेही बाधा लागणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही, कटुता वाढणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने वागावं असं आवाहन मी करेन.’ असं अजित पवार म्हणाले.