पुणे – गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची (baramati) राज्याच्या राजकाणात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामती दौऱ्यादरम्यान 2024 च्या निवडणुकांमध्ये बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले’ असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी केलं.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या याच वक्तव्याला आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर आले आहे. “बारामतीत कुणीही येऊ द्या. त्यांचं स्वागतच आहे.

पण मतदानाच्या दिवशी काय करायचं, कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना (Baramati) चांगलंच माहिती आहे, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) निक्षून सांगितलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार कुटुंबियांची पकड असलेल्या बारामतीतच थेट भाजपने बदलाची गर्जना केल्यानंतर अवघ्या देशाचं लक्ष या मतदारसंघावर खिळलं आहे.

अजित पवारांचा चंद्रशेखर बावन्नकुळे यांना टोला…

“भाजपचे प्रांत अध्यक्ष यांची नव्याने नियुक्ती झालीय. त्यांना हुरूप आला. बारामतीला आले नसते तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते इथे आले म्हणून प्रसिद्धी मिळाली…’ असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…

“आमचे मिशन भारत इंडिया आहे. बारामती महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मिशन महाराष्ट्र अंतर्गत बारामती आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

‘प्रत्येक निवडणूक शेवटची समजून लढल्यास यश नक्की मिळते’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.