मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी २०२२ चा अर्थसंकल्पीय बजेट (Union Budget 2022) संसदेत जाहीर केले आहे. याच अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडवी टीका केली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेटवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या बजेटवर टीका करण्याचे सत्र कुठे थांबण्याचे चित्र दिसत नाही. अशातच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी देखील बजेटवर टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले, केंद्राने चालू आर्थिक वर्षात एकूण २ लाख २० हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी (Central GST) वसूल केला. त्यातले तब्बल ४८ हजार कोटी महाराष्ट्रातून (Maharashtra) वसूल करण्यात आले.

Advertisement

या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले. निधीवाटपातल्या या अन्यायाचं प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही अशी कडवी टीका पवारांनी केली आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा साठ लाख नोकऱ्यांचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे.

एलआयसी’च्या आयपीओची घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या २५ वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक आहे.

Advertisement

निवडणूका असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात या दिशेने केंद्र सरकारने काय केले याचे उत्तर आता तरी द्यावे.

मेक इन् इंडिया (Make in India), आत्मनिर्भर भारत (Self-reliant India) या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणाही हवेत विरुन जातील, असं दिसते आहे असेही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

Advertisement