मुंबई – बुधवारी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav) निमित्ताने 10 दिवस मंगलमय होतात. आज घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. आणि याच दरम्यान महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते नेतेमंडळींकडील गणेशोत्सवाला दिग्गजांची हजेरी लागताना दिसत आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील अनेक राजकीय मंडळींच्या घरी गणपतींचं दर्शन घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, आता यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता खोचक टीका केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “गणेश उत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. पण याआधी कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो,

मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली आहे.

दसरा मेळाव्यानंतरच कळेल खरी शिवसेना कुणाची ते…

तसेच यावेळी अजित पवार यांनी दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले असताना या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“शिवसेना स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना (Shivsena) चालेल, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं.

ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल वाद घालून चालणार नाही. मात्र जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच कळेल.

निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची शिवसेना खरी कुणाची ते.” असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.