आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका करीत असतात.

आता त्यांनी भावी अधिकारी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येप्रकरणी अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांना स्वप्नीलची नाही, तर फक्त पार्थची काळजी आहे, असे ते म्हणाले.

आमदारकी, खासदारकी, कारखाना मिळण्याची चिंता

लोणकर आत्महत्या प्रकरणावरून पडळकर यांनी अजित पवार यांच्या जोरदार टीका केली. पवार यांना स्वप्नीलचे काही घेणेदेणे नाही, त्यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे.

Advertisement

पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का, याची चिंता पवार यांना असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

पडळकरांनी लोणकर कुटुंबीयांची घेतली भेट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नीलने या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्वप्नीलचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. स्वप्नीलच्या मृत्यूमुळे लोणकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर आज पडळकर यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल होते.

मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही अजित पवार यांनी अद्याप लोणकर कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला सरकारची अनास्थाच कारणीभूत असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नीलच्या घरच्यांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी विधानसभा अधिवेशनावेळी सभागृहात केली होती.

Advertisement

अधिवेशन होऊन गेले; मात्र अजून सरकारकडून स्वप्नीलच्या घरच्यांना ठोस मदत मिळालेली नाही. सरकार नुसत्या बैठका घेणार असेल तर मी या सरकारचा निषेध करतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचा प्रतिनिधी पाठवून लोणकर कुटुंबीयांची भेट घेणे गरजेचे होते; मात्र अद्याप तसे घडलेले नाही, अशा शब्दांत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

 

Advertisement