ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अजितदादांनी केली पटोलेंची पाठराखण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील नेते आणि लोकप्रतिनिधींचे फोन टॅप केले जात होते. हे फोन टॅप करताना त्यांना खोटी नावे दिली जात होती आणि हाच प्रकार पटोले याच्यासोबत घडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकशाहीविरोधी कृत्य

या प्रकरणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे कृत्य हे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी किंवा मग सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आले तर योग्य आहे असे म्हणता येते; मात्र व्यक्तिगत फायद्यासाठी जेव्हा असे केले जाते, तेव्हा ते कृत्य बेकायदेशीर आणि लोकशाहीविरोधी असते, असे पवार पुढे म्हणाले.

काय होता पटोलेंचा आरोप ?

२०१६-१७ मध्ये मी जेव्हा भाजपचा खासदार होतो, तेव्हा राज्यात फडणवीस सरकार होते. त्या वेळी एका फेक नावाने एक फोन टॅप करण्यात आला होता, असा दावा पटोले यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता.

पटोले यांनी केलेला हा आरोप म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर सोडलेले हे टीकास्त्र असल्याचे मानले जात आहे.

ड्रॅग तस्करांच्या नावाने फोन टॅपिंग

नाना पटोले यांचा फोन अमजद नावाच्या एका ड्रग तस्कराच्या नावाने टॅप करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी सांगितले होते. पटोले यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली होती.

पटोले यांनी केलेल्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

You might also like
2 li