भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणच्या आभासी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चाैकशीची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?

पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेच्या पत्राच्या आधारावर भाजपाने सीबीआय चौकशीची मागणी करणारा हा ठराव मंजूर केला. अँटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पियो कारमध्ये स्फोटक ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप सचिन वाझेवर आहे. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. त्यानंतर १० दिवसांनी ज्यांच्याकडे ही स्कॉर्पियो कार होती, त्या मन्सुख हिरेन यांचा ठाण्यातील खाडीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला.

Advertisement

परमबीर यांचे गंभीर आरोप

राष्ट्रीय तपास संस्थेकडे हे प्रकरण तपासासाठी गेल्यानंतर या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सचिन वाझेलाच अटक झाली. त्यानंतर त्याला पोलिस सेवेत घेण्याचा ठपका मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठेवून त्यांची बदली झाली.

त्यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र लीक झाले आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

घटनाक्रमांचा परस्परांशी संबंध

या आरोपांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. उच्च न्यायालयाने देशमुखांविरोधात प्राथमिक सीबीआय तपासाचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनाही गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Advertisement

आता या प्रकरणात माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक झाली आहे. ते शिवसेनेचे उमदेवार होते. त्यामुळे हा सर्व घटनाक्रम एकमेकाशी जोडलेला आहे. आता अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.