राज्यातील सरकारमध्ये समन्वय नाही. कुणी कुणावरही टीका करतो. ज्येष्ठत्वाचा विचारही केला जात नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘सरकारवर कोणी टीका केली किंवा मित्रपक्षातील कोणी काही बोलले, तर शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी उत्तर देऊ नये. त्याबाबतची अधिकृत भूमिका वरिष्ठ नेते घेतील, अशी समज दिली.

मित्रपक्षांना दुखवू नका

राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे व चेतन तुपे, महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

सरकारमधील तीन पक्षांना पक्षसंघटना वाढविण्याचा अधिकार आहे. आपला पक्ष वाढवताना मित्रपक्षातील कोणाचेही मन दुखवू नका,’ असा सल्ला त्यांनी दिला.

Advertisement

‘नवीन चेहऱ्यांना संधी द्या’

‘शहर कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी द्या. पक्षाच्या बैठकीसाठी महत्त्वाच्या व्यक्तींना बोलवा. गटातटाचे राजकारण करू नका. वाद, मतभेद टाळा. संघटना कार्यकर्त्यांच्या बळावर वाढते; पण काही कार्यकर्त्यांनी चुका केल्या, की इतरांना किंमत मोजावी लागते.

पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना कमीपणा येईल, असे वर्तन कार्यालयाची पायरी चढल्यानंतर किंवा इतर ठिकाणीही नको,’ अशी तंबी पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिली.

 

Advertisement