Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अजित शिंदे यांनी शोधला कामात विठ्ठल

परमेश्वर चराचरात भरला आहे. त्याला एखाद्या स्वरुपात शोधायची गरज नाही. हरिनामात तल्लीन होऊनही आपलं नित्य काम पार पाडता येतं, हे संत गोरा कुंभार, संत सावता माळी यांनी दाखवून दिलं आहे.

कामात राम म्हणतात, ते याचसाठी. असंच एक उदाहरण अग्निशमन दलातील अजित शिंदे यांनी घालून दिलं आहे.

कार्यात विठ्ठल

लाखो वारकऱ्यांमधून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची संधी शिंदे यांना मिळाली.

त्यासाठी ते आळंदीला जात होते; मात्र, वाटेत आगीची घटना पाहून शिंदे यांनी आग शमवण्यास प्राधान्य दिले आणि माझा विठ्ठल कार्यातच आहे, असं त्यांनी कृत्यातून दाखवून दिले.

काय घडलं ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा शंभर वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यासाठी पुण्यात नऱ्हे आंबेगाव येथे राहणाऱ्या अजित शिंदे यांची निवड झाली होती.

शिंदे हे अग्निशमन दलात जवान म्हणून सेवेत आहेत. ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आळंदीला जाण्यासाठी निघाले होते. ते सातारा रस्त्याने जात असताना त्यांना सिटी प्राइड येथे मोठी आग लागल्याचे दिसून आले.

शिंदे यांनी घटना पाहताच मोर्चा आगीकडे वळवला. तेथून महापालिकेचा छोटा टँकर जात होता. त्यांनी त्या टँकरमधून पाइप घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर शिंदे यांनी पुन्हा आळंदीची वाट धरली.

१८ वर्षापासून वारीची परंपरा

शिंदे यांचे वय ३३ वर्षे आहे. त्यांच्या घरात गेल्या १८ वर्षांपासून वारीची परंपरा आहे. ते स्वतः गेल्या दहा वर्षांपासून दर वर्षी न चुकता वारी, पालखी प्रस्थान सोहळ्याला जात आहेत.

गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी आणि पालखी प्रस्थान सोहळ्यावर निर्बंध आले आहेत; मात्र यंदाच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला जाण्याचे भाग्य शिंदे यांना लाभले.

 

Leave a comment