गेल्या दीड वर्षांपासून लोकसेवा आयोगाच्या जागा भरल्या न गेल्याने युवकाने आत्महत्या केल्याची दखल अखेर राज्य सरकारने घेतली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना ३१ जुलैअखेर नियुक्त्या करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे एका २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील सुनील लोणकर या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या मुद्द्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील, अशी घोषणा केली.

Advertisement

गांभीर्याने निर्णय घेणार

सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नील लोणकर यांचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब वेदनादायी आहे. कोणीही असं करू नये या मताचा मी आहे. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, की कालच्या कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली. कोरोनाचे संकट  14 महिन्यांपासून सुरू आहे. काल एका राज्याच्या मुख्यमंत्र्याना पद सोडावे लागले. कारण निवडणूक घेतली नाही. सर्वोच्च न्यायालय काही निर्देश देते. त्यामुळे भूमिका घ्यावी लागते. पण एमपीएससीचा मुद्दा आता गांभीर्याने घेतला असून 31 जुलै 2021 पर्यंत सर्व रिक्त जागा भरणार, असा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार सकारात्मक येणार

मुला-मुलींच्या मनात नैराश्याची भावना आहेत. सभागृहाचे कामकाज संपल्यावर याबद्दल बैठक होणार आहे.  वर्ग एकच्या जागा भरण्यासाठी एमपीएससीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आता जी परिस्थिती निर्माण झाली, त्यावर राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेणार आहे. उद्धव ठाकरेही भरती तातडीने करण्याच्या मुद्द्यावर आग्रही असतात; पण सर्वोच्च न्यायालयाने काही नियम दिले असल्याने तसं काम करावं लागतं.

स्वप्नीलच्या कुटुंबीयांना मदत करणार

स्वप्नीलसोबत जे झालं ते वेदनादायी आहे. अशी घटना कुणासोबतच घडू नये. परीक्षेत तो पात्र ठरला होता; पण एसीबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे एमपीएससीच्या सर्व भरती थांबवाव्या लागल्या. स्वप्नीलच्या कुटुंबाला मदतीबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेणार आहे. आम्ही लोणकर कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत.

Advertisement