‘महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं मी सोनिया गांधी यांना सांगितलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायची आहे, असं आश्वासन मी त्यांना दिलं आहे. ‘फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत भूमिका मांडली होती.

मला काही ते सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले, तरी मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

माझ्या उपस्थितीचा दररोज रिपोर्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पटोले यांनी, आपले वाक्बाण सोडणे सुरूच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपाची आणि टीकेची एकही संधी पटोले सोडत नाहीत.

Advertisement

त्यांच्या वक्तव्यामुळं सत्ताधारी तीनही पक्षांतच विसंवाद असून, काँग्रेसच्या मंत्र्याचीही त्यामुळे अडचण होत आहे. ‘आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी नऊ वाजता द्यावा लागतो.

बैठका, आंदोलन कुठे सुरू आहेत, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचासुद्धा रिपोर्ट गेला असेल.

रात्री तीन वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल; पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,’ असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

Advertisement

शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली

‘मी स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार,’ असं ते म्हणाले.