मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात आता अनेक गाैप्यस्फोट व्हायला लागले आहेत. देशमुख यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यांच्या दोन स्वीय सहायकांना ईडीने बेड्या ठोकल्या आहेत.
आज करणार न्यायालयासमोर सादर
देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या.
मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपुरातील निवासस्थानी छापेमारी
देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने शुक्रवारी छापेमारी केली. तब्बल 8 ते 9 तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली.
त्यानंतर संध्याकाळी ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.
सचिन वाझेचाही तुरुंगातून जबाब
दुसरीकडे तळोजा कारागृहातून निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याचाही जबाब नोंदवण्यात आला. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवले.
सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.