१२ आमदारांच्या नियुक्त्याबाबत आणखी एक याचिका दाखल

राज्य सरकारने पाठविलेल्या १२ आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी आठ महिन्यांत निर्णय घेतला नाही. राज्यघटनेच्या नियमांचे हे उल्लंघन असून, त्यांचे निर्णय कायदेशीर कारवाईच्या कक्षेत आणणारी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

राज्यपाल जरी कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले, तरी त्यांचे निर्णय कायद्याच्या कक्षेत असणं आवश्यक आहे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

न्यायालयापुढे आधीच 12 सदस्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या याचिका प्रलंबित आहे. त्यात ही नवीन याचिका आल्याने न्यायालय त्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करता येतो का ?

नाशिकचे रहिवासी रतन सोली यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्यायामूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

राज्य सरकारने राज्यपालांकडे 12 सदस्यांची नावे पाठवली आहेत; परंतु त्यावर आठ महिने होऊनही निर्णय झालेला नाही.

राज्यपाल जरी कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले, तरी त्यांचे निर्णय कायद्याच्या कक्षेत असणे आवश्यक आहे, असा दावा याचिकाकर्ते सोली यांनी केला आहे.

त्यावर जनहित याचिकेद्वारे राज्यपालांच्या निर्णयावर सवाल उठवता येतो का? असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे.

विचारण्याचा अधिकार

संविधानान दिलेल्या अभयामुळे राज्यपालांना कोणत्याही प्रकारे कायद्याच्या चौकटीत आणता येत नाही; मात्र त्यांच्या निर्णयांबाबत सवाल विचारण्याचा अधिकार आहे, आम्ही केवळ राज्यपालांनी यावर भूमिका स्पष्ट करावी इतकीच मागणी करतो आहोत.

राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यावा, त्यानुसार मग सरकार पुढची कार्यवाही करू शकेल, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

कायद्याने सरकारने पाठवलेली नावे मान्य करणे राज्यपालांना बंधनकार आहे; मात्र तरीही निर्णय घेतला जात नाही. हा प्रकार कायद्याने संमत केलेल्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे, असा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे.