कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता मात्र परिस्थिती सुधारतं आहे. आता रुग्णसंख्या कमी होत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या सीरो सर्वेक्षणात ८१ टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये आता प्रतिपिंडे तयार झाली आहेत.
दहा हजार नमुन्यांवर चाचणी
सीरो सर्वेक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील दहा हजार नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी आठ हजार २०७ नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या. हे प्रमाण ८१.४० टक्के इतके आहे.
गावठाण भागात सर्वाधिक म्हणजेच ८४.५ टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे, तर एक हजार ८७५ नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्याचे प्रमाण १८.६ टक्के आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि वैद्यकीय विभागाकडून हे सीरो सर्वेक्षण करण्यात आले होते.
जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद
कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने हे चांगले लक्षण मानले जात आहे.
जम्बो सेंटरमधील रुग्ण कमी झाल्यानंतर एक जून रोजी रुग्णालयातील तीनशे ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या.
पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे २२ मार्चपासून जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते.
गरज पडल्यास पुन्हा सुरू करणार
दुसऱ्या लाटेत २२ मार्च ते एक जुलै दरम्यान एकूण तीन हजार नऊ रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी एक हजार ९०९ जण बरे होऊन घरी परतले, तर ६५४ जणांचा मृत्यू झाला.
पुन्हा गरज पडल्यास हे जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.