Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुण्याच्या कंपनीने बनविले अँटीव्हायरस कोटिंग मास्क

कोरोनापासून संरक्षणासाठी बाजारात वेगवेगळे मास्क असले, तरी आतापर्यंत कोरोना विषाणूला जवळपास फिरकू न देणारे मास्क बाजारात उपलब्ध नव्हते. आता मात्र ही समस्या दूर झाली आहे.

कोरोना विषाणूला करतो निष्क्रिय

पुण्यातील थिंकर टेक्नॉलॉजीज या कंपनीनं अँटी व्हायरल मास्कची निर्मिती केली आहे. हे विशिष्ट तंत्र वापरून तयार केलेले एन-95 मास्क असून त्यांच्याभोवती अँटी-व्हायरस कोटिंग लावण्यात आल्यामुळं या मास्कच्या संपर्कात येताच कोरोना विषाणू निष्क्रिय होत असल्याचं सिद्ध झालं आहे.

गेल्या दोन महिन्यांत या प्रकारचे 10 हजार मास्क कंपनीनं विकले असून विविध सरकारी हॉस्पिटल्स आणि कार्यालयांमध्ये त्याचा पुरवठा सुरू आहे.

काय आहे फॉर्म्युला ?

हे मास्क तयार करताना नेहमीच्या एन-95 मास्कवरच एक अतिरिक्त कापडी पट्टी लावण्यात येते. ही पट्टी अँटी-व्हायरल घटकांची प्रक्रिया केलेली असते. ही पट्टी म्हणजे एक प्रकारे कोरोना विषाणूंचं जाळं ठरतं.

हवेतून जर कोरोनाचा विषाणू चेहऱ्याकडे आला, तर या मास्कच्या संपर्कात येतात अँटी-व्हायरल पट्टीच्या प्रभावाने तो निष्क्रिय होतो.

या मास्कवरील पट्टीत वापरण्यात येणारे केमिकल्स हे कोरोना व्हायरसमध्ये प्रवेश करतात आणि पेशींमध्ये शिरकाव करण्याची त्याची क्षमताच संपवून टाकतात.

एकदा व्हायरसची इन्फेक्शन करण्याची क्षमता संपली, की तो व्हायरस धोकादायक राहत नाही, अशी माहिती थिंकर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक अध्यक्ष शीतलकुमार झंबाड यांनी दिली आहे.

दोन प्रकारचे मास्क

यातील मूळ अँटी-व्हायरल मास्क हा एकदाच वापरून फेकून देण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आला आहे. तर थ्री-डी फिल्टर मास्क हा वर्षभर वापरता येतो, असा दावा कंपनीनं केला आहे. हे दोन्ही मास्क परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होणार असून लवकरच त्यांची बाजारातील किंमत जाहीर करण्यात येणार आहे.

 

Leave a comment