पुणेः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रा-रूप विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. रिंग रोड, मेट्रो मार्गिका, नागरी विकास केंद्रे, सार्वजनिक गृहप्रकल्प अशा पायाभूत सुविधांसह कृषी उत्पन्न बाजार केंद्रे,

जैवविविधता उद्याने, औद्योगिक संशोधन केंद्रे अशा सुविधांच्या निर्मितीला प्राधिकरणाच्या क्षेत्रात चालना देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. हा विकास आराखडा लवकरच नागरिकांच्या हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे.

हरकती मागविणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत प्रा-रूप विकास आराखड्याच्या प्रसिद्धीसाठी मान्यता दिली गेली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

२३ गावांचाही विकास आराखड्यात समावेश

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांलगतच्या वेगाने विकसित होणाऱ्या परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. सहा हजार चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला होता.

त्यानंतर त्याला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यावर अखेर तो नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात आली.

पुण्यात नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी प्राधिकरणालाच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आल्याने या गावांमधील नागरी सुविधा क्षेत्रांचा समावेश या विकास आराखड्यात आहे.