पुणे – राज्यतील (maharashtra) अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस (Monsoon) सुरू आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली असून अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुणे शहर आणि परिसरात देखील पावसानी जोरदार बॅटिंग केली आहे. पुणे (pune gramin) जिल्ह्यात तर अद्यापही जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही काल रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक सिंहगडावर (Sinhagad) जाण्यासाठी निघाले होते.

मात्र रस्त्यातूनच त्यांना माघारी लावण्यात आले. आजपासून (सोमवार) पर्यटन स्थळे खुली होण्याची शक्यता आहे. मात्र रविवारीचा मुहूर्त साधत गेलेल्या पर्यटकांच्या (Tourist) पदरी मात्र निराशा पडली आहे.

कारण पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे हजारो पर्यटक गडाच्या दिशेने निघाले होते. मात्र सिंहगडाच्या (Sinhagad) पायथ्याशी गोळेवाडी येथे वन विभागाच्या तपासणी नाक्यावरून पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले.

गड बंद असल्याचे पर्यटकांना सांगण्यात आले. मात्र, दुसरीकडे गड बंद असल्याची माहिती दर्शविणारा फलक लावलेला नसल्याने कर्मचाऱ्यांचीही सांगता सांगता दमछाक झाली आहे.

पुणे जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. लोणावळा, खंडाळा, लोहगड, पवना धरण परिसर, सिंहगड, मढेघाट, माळशेज घाट. इ. अनेक ठिकाणे पर्यटकांना खुणावत आहेत.

अश्या ठिकाणी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दि. 14 जुलै ते 17 जुलै 2022 या कालावधीपर्यंत सिंहगड किल्ला (Sinhagad) पर्यटकांसाठी पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते.