file photo

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या उद्‌घाटन समारंभाला गर्दी जमविणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व त्यांच्या सहका-यांना चांगलंच महागात पडलं. त्यांच्यासह त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.

राज्यभरातून संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला जमविलेल्या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती.

मात्र जामीन मिळताच त्यांची अवघ्या काही वेळात सुटकाही झाली. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गर्दी जमवल्या प्रकरणी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द पवारांनीच दिले होते.

त्यानुसार राष्ट्रवादीच्या दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र पोलिसांनी जामीन मंजूर करत त्यांची सुटकाही केली.

जगतापांकडून दिलगिरी

पुढच्या काळात नियमांची पायमल्ली करणार नाही. सर्व नियम पाळू. गर्दी जमवल्या प्रकरणी आम्ही पुणे शहराची दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.