भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरे यास अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले.

मध्य प्रदेशातील इंदूर येथून कांडरे यास बेड्या ठोकल्या. कांडरेच्या अटकेमुळे मोठे मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे.

या १३ जणांना अटक

‘बीएचआर’ आर्थिक घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मागील काही महिन्यापासून राज्यभरात कडक कारवाई केली जात आहे.

Advertisement

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाडून 17 जून रोजी धुळे, जळगाव, औरंगाबाद, जामनेर, भुसावळ व अंमळनेर धडक कारवाई करीत भागवत भंगाळे (जळगाव), छगन झालटे, जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भूसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोहार (जामनेर), प्रीतिश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रमोद किसनराव कापसे (अकोला),प्रेम नारायण कागोटा (पुणे) अशा 13 जणांना अटक केली होती. त्यामध्ये जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापतीसह, जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे याचा समावेश होता.

प्रदीर्घ काळ पोलिसांच्या हातावर तुरी

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व अवसायक जितेंद्र कांडरे हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पुणे पोलिसांनी या प्रकरणात अधिक कडक कारवाई सुरु केल्यापासून कांडरे हा पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिस त्याच्या मागावर होते.

दरम्यान, कांडरे हा मध्य प्रदेशातील इंदूर येथे असल्याची खबर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास सोमवारी मिळाली. त्यानंतर पथकाने सोमवारी रात्रीच तत्काळ इंदूर गाठले.

Advertisement

त्यानंतर हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या कांडरे यास अटक केली. कांडरे यांच्या अटकेमुळे या प्रकरणात सहभागी असलेले मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशी आहे ‘बीएचआर’ पार्श्वभुमी !

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके व त्यांच्या पथकाने नोव्हेबर 2020 मध्ये ‘बीएचआर’च्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणात मोठी कारवाई केली होती.

पथकाने यापूर्वी अटक केलेल्या पाच संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. 61 कोटी 90 लाख 88 हजार रुपयांचा अपहार, फसवणुकीचा प्रकार घडला होता.

Advertisement