पुणे – ‘भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि गणपती’ यांचाही फोटो मुद्रित कराव्यात अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal Delhi CM) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मात्र, आता या व्यक्तव्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील (pune police) कोंढवा पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धार्मिक भावना भडकविल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. ‘भारतीय चलनावर गणपती, लक्ष्मीचे फोटो छापा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उंचावेल ‘,

असे अंधश्रध्दा पसरविणारे वक्तव्य करून अंधश्रध्देला चालना देण्याचे घाट घातल्याकारणाने केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने कोंढवा पोलिसांना देण्यात आले आहे.

पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. राज्या -राज्यात धार्मिक भा्वना भडकावण्याचा प्रयत्न केल्याबाबत संपूर्ण देशाची माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. तसेच, कोंढवा पोलिसांकडून अद्याप याबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.

काय म्हणाले होते? अरविंद केजरीवाल वाचा….

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल म्हणाले होते, “एकीकडे देशाचं चलन कमकुवत होत आहे. तर अर्थव्यवस्थाही दोलायमान परिस्थितीत आहे.

आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा ईश्वराची आठवण होते. आपण दिपावलीला लक्ष्मीपूजन केलं. यावेळी आपण लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली.

अत्यंत गंभीर परिस्थितीतही आपण देवावर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत माझं आवाहन आहे की, भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे फोटो छापावेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

अशी मागणी करताना ते पुढे म्हणाले की, नोटेवर गांधीजींचा फोटो तसाच ठेवावा, पण मागच्या बाजूला देवांचा फोटो लावावा. लक्ष्मीपूजनाला रात्री पूजा करताना माझ्या मनात आलं की नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो का लावू नये. मी अनेक लोकांशी याबाबत चर्चा केली. यावर कोणालाही आक्षेप असेल असं वाटत नाही, असंही केजरीवाल म्हणाले.