काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज संधी मिळेल, तेव्हा काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर करत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

स्वबळाच्या मुद्द्यावरून आघाडीकडून काँग्रेसला चिमटेही काढले जात आहेत; मात्र असं असतानाही काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पटोले यांच्या घोषणेवर कानावर हातच ठेवले आहेत.

दोन माजी मुख्यमंत्री सहमत; एकाचे कानावर हात

पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आणि सत्तेत येण्याचा दावा केला आहे. त्यांच्या मुद्याशी दोन माजी मुख्यमंत्री सहमत असले, तरी एका माजी मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्याला त्याबाबत काहीच माहिती नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

Advertisement

पटोले यांच्या स्वबळाच्या मुद्दयाची आता सहकारी पक्षच खिल्ली उडवित आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने तर पटोले यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी स्वबळाच्या पटोले यांच्या सूरात सूर मिसळला आहे; मात्र तिसरे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वबळाच्या मुद्दयावर कानावर हात ठेवले आहेत.

काँग्रेसजण पटोले यांच्यापासून चार हात दूर

पटोले यांच्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याने आता काँग्रेसचे नेतेही त्यांच्यापासून चार हात दूर राहत आहेत.

Advertisement

पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी के. एच. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

या पार्श्वभूमीवर नांदेडला आलेल्या चव्हाण यांना पटोले यांच्या स्वबळाच्या ना-याविषयी विचारले असता आपल्याला काहीच माहिती नाही, असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.

स्वबळाच्या मुद्यावर काँग्रेसमध्येच दोन गट

स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं अधोरेखित झालं आहे. चव्हाण नांदेडमध्ये आल्याने पत्रकारांनी त्यांना गाठलं अन् थेट नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबतच प्रश्न केला; मात्र त्यावरील चव्हाण यांचं अनपेक्षित उत्तर ऐकून पत्रकारही अवाक् झाले.

Advertisement

ना हा विषय आता संपला असून आमचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावा चव्हाण यांनी केला. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पटोलेंच्या कार्यशैलीवर आक्षेप ?

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचं वारंवार सांगितलं होतं.

मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा वगळता बहुतेक नेत्यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर भर दिला होता; पण पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवसापासूनच स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

Advertisement

निवडणुकांना अजून तीन वर्षे असतानाही पटोले यांनी स्वबळाची भूमिका रेटली आहे. पटोलेंचा हा निर्णय न पटल्याने त्यांच्या या भूमिकेवर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

चव्हाण यांनी पटोलेंच्या या निर्णयाची माहितीच नसल्याचं सांगून पटोलेंच्या निर्णयाला नाकारले आहे. तसेच अप्रत्यक्षपणे पटोलेंच्या कार्यशैलीवरही आक्षेप घेतला आहे.

 

Advertisement