गारवा हॉटेलमुळे आपल्या हॉटेलचा व्यवसाय कमी होत असल्याने अशोका हॉटेलच्या मालकांनी सराईत गुन्हेगार असलेल्या भाच्याला सुपारी देऊन गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, न्यायालयाने आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही आहेत आरोपींची नावे

बाळासाहेब खेडेकर (वय ५६), निखिल खेडेकर (२४), सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी (२१), अक्षय दाभाडे (२७), करण खडसे (२१), प्रथमेश कोलते (२३), गणेश माने (२०), निखील चौधरी (२०, सर्व रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रामदास आखाडे यांचा भाऊ संतोष आखाडे (४७) यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

दररोज एक हजार रुपये देण्याचे आमिष

आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. आखाडे यांच्या गारवा हॉटेलशेजारी आरोपी बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे अशोका हॉटेल आहे.

गारवा हॉटेलमुळे अशोका हॉटेलचा व्यवसाय कमी होत होता. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले.

त्या बदल्यात दररोज एक ते दोन हजार रुपये देऊ, असे खेडेकर पिता-पुत्राने चौधरीला सांगितले. त्यानुसार चौधरी याने नीलेश आरते व अन्य साथीदारांच्या मदतीने कट रचून आखाडे यांचा खून केल्याची माहिती सरकारी वकील दीक्षित यांनी न्यायालयाला दिली.

Advertisement

त्यानंतर न्यायालयाने आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

…म्हणून रचला खुनाचा कट

पुणे-सोलापूर रस्त्यावर उरुळी कांचन येथे गारवा हॉटेलशेजारी अशोका हॉटेल आहे. गारवा हॉटेलचा रोजचा व्यवसाय दोन ते अडीच लाख रुपये असून, अशोका हॉटेलचा व्यवसाय साधारण ५० ते ६० हजार रुपये आहे.

गारवा हॉटेल बंद असताना, अशोका हॉटेलचा व्यवसाय वाढून अडीच ते तीन लाख रुपये होत असे. त्यामुळे गारवा हॉटेल कायमचे बंद झाल्यास अशोका हॉटेलच्या रोजच्या व्यवसायात वाढ होईल, या विचाराने आरोपींनी खुनाचा कट रचल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Advertisement