पुणे :- कायद्याचे हात लांब असतात, असे म्हणतात. पोलिसांनी ठरविले, तर गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोचविले जाऊ शकते. दरोडेखोरांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे.

मोठ्या दंडाची शिक्षा :- ट्रकमध्ये झोपलेल्या चालकांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटणाऱ्या तीन अट्टल दरोडेखोरांना न्यायलयानं दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी साडेदहा लाख रुपयांचा दंड ठोठावला. मोक्का कायद्यानुसार झालेली ही कारवाई आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोषींना आणखी अडीच वर्षांचा कारावास भोगावा लागेल.

शिक्षा झालेल्यांची नावे :- विजय उर्फ विज्या बिभीषण काळे, बाजीगर उर्फ बिऱ्या वाघमन्या काळे, उद्देश बिभीषण काळे (सर्व रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली, पुणे) येथे २७ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री तीन ते सव्वातीनच्या दरम्यान हा गुन्हा घडला.

Advertisement

असा घडला गुन्हा :- गणेश शिंदे, रामधारी यादव, धनंजय पोनकालापाडू, रावसाहेब शेजाळ, रवी कोटी, राहुल सिंग हे ट्रकचालक आपले ट्रक सोरतापवाडी येथील पेट्रोल पंपाच्या मागे मोकळ्या जागेत लावून ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते.

या वेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून गणेश शिंदे यांच्या उजव्या खांद्यावर व डोळ्यावर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी ट्रकचालकांकडून ६६ हजार रुपये रोख, तसेच सोन्याचे दागिने, मोबाईल आदी ऐवज चोरून नेला.

आतापर्यंत २६ गुन्हे :- या गुन्ह्यात मुख्य आरोपी विजय उर्फ विज्या बिभीषण काळे असून त्याच्यासह तिघांनी २६ गंभीर गुन्हे केले आहेत, असे पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले होते.

Advertisement