मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना 31 जुलै रोजी ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. आणि दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

तेव्हापासून राऊत ईडी कोठडीत होते. नुकतंच संजय राऊत यांच्या जामीनावर 8 ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्याच वेळी त्यांनी कोर्टाबाहेर बसून आईला भावनिक पत्र (Sanjay Raut Letter) लिहले. “आई मी नक्कीच परत येईन..’ असे भावूक आश्वासन राऊत यांनी आईला लिहलं आहे.

त्यांचे हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, या पत्रानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सत्ताधाऱ्यांकडूनही उत्तर दिलं जात आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत संजय राऊतांच्या या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटमध्ये, “पत्र आईसाठी लिहिले होते, बहुधा पत्ता चुकला आणि मीडियाकडे पोहोचले…”, एवढेच म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटवर रिअॅक्शन्स देखील येत आहेत.

तत्पूर्वी, संजय राऊत यांनी आपल्या पत्रात त्यांना झालेली अटक आणि त्यावेळच्या प्रसंगाची कहाणी कथन केली आहे. तसेच या कठीण काळातही आई पाठिशी ठामपणे उभी होती. तसेच तिच्याकडूनच संघर्षाची शिकवण मिळाल्याचे राऊतांनी पत्रात म्हटले आहे.