“यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊदे. त्यांच्या शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे.

बा पांडुरंगा, जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”, असं साकडं उपमुख्यमंत्र्यांनी बा पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी घातलं आहे.

कोरोनाचं संकट संपल्यानंतर पंढरीला सर्व जाऊ

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पवार यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची संतपरंपरा, पांडुरंगभक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकरी माउलींनाही वंदन केलं आहे.

समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करून, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं, सर्वांना एकत्र, समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंगभक्तीची, पंढरपूरवारीची परंपरा आपलं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे.

हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. बा पांडुरंगाच्या कृपेनं कोरोनाचं संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीनं पंढरपूरला जाऊ शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री रेंजरोव्हरने पंढरपूरला

मुख्यमंत्री नेहमीची मर्सिडीजऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले.

ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात; पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीजऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.

कमी दृश्यमानतेतही सफाईदार ड्रायव्हिंग

सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची दृष्यमानता कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत होते.

कोरोना नष्ट कर

महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.