शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला.

बाबासाहेबांचे शंभरीत पदार्पण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 99 वाढदिवस. आज ते शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचं आयोजन टाळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

Advertisement

शिवशाहीरांच्या पायावर ठेवलं डोकं

राज यांनी सर्वप्रथम शिवशाहीरांचा सन्मान केला. गुलाबपुष्प आणि पगडी घालून शिवशाहीरांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचे आशीर्वादही घेतले.

न बोलता गेले निघून

सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर राज कार्यक्रमस्थळी आले. शिवशाहिरांचा सन्मान केल्यानंतर, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर आणि आशीर्वाद घेतल्यानंतर राज काहीतरी बोलतील, अशी सगळ्यांना अपेक्षा होती; पण ते काहीही न बोलता तिथून बैठकीसाठी रवाना झाले.

पुरंदरे- ठाकरे कुटुंबांचं जुनं नातं

पुरंदरे आणि ठाकरे घराण्याचं नातं हे गेल्या काही दशकापासूनचं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष जिव्हाळा होता.

Advertisement

पुरंदरे यांच्या अनेक व्याख्यानांना बाळासाहेब हजेरी लावायचे. त्यांच्या बरोबर ते राज यांनादेखील घेऊन जायचे.

बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या पुण्या-मुंबईत भेटीही व्हायच्या. या वेळीही राज सोबत असायचे. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व राज यांना विशेष भावतं. राज यांनी बाबासाहेबांची रायगडावर विशेष मुलाखत घेतली होती.

बाबासाहेब-राज यांचा जिव्हाळा

राज पुणे दौऱ्यावर असले आणि वेळ असला, की ते आवर्जून बाबासाहेबांच्या घरी जात असतात. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाला होता, त्या वेळीदेखील राज यांनी पुरंदरेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

Advertisement