लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत इतर मागासवर्गीय असल्यानेच आपल्याला दुय्यम खाते मिळाले.

खरेतर ज्येष्ठता लक्षात घेऊन महसूल मंत्रिपद मिळायला हवे होते, अशी खदखद मदत व पुनर्वनस मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर थोरात यांनी वडेट्टीवार यांना सबुरीचा सल्ला दिला.

वडेट्टीवारांच्या घरच्या आहेरामुळे काँग्रेसमध्ये खळबळ

मी ओबीसी असल्यानेच महसूल खातं न देता मदत आणि पुनर्वसन खाते देण्यात आले असा गंभीर आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. या आरोपानंतर एकच राजकीय खळबळ उडाली. या प्रतिक्रियेनंतर महसूल मंत्रिपद सांभाळत असलेल्या थोरात यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे.

Advertisement

काँग्रेस जातीयवादी नाही

थोरात यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की वडेट्टीवार यांचे वयोमन पाहता त्यांना मोठी संधी मिळेल. त्यांना थोडी वाट पाहावी लागेल. काँग्रेस जातीयवादी पक्ष नसल्याचे ते म्हणाले.

पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असून त्यांना वेगळं काही तरी बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईकांना संधी दिली, बॅरिस्टर अंतुले यांना संधी दिली. त्या पद्धतीने त्यांनाही संधी मिळेल; पण वाट पाहावी लागेल.

स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय ते लग्न करणार नव्हते

या वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेईन म्हटल्याच्या वक्तव्यावर ते म्हणाले, की तुम्ही त्यांचे विधान फार गांर्भीयाने घेतलं. जोवर स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोवर लग्न करणार नाही. त्याचे काय झालं?

Advertisement

अशी विचारणा त्यांनी केली. सत्तेसाठी काहीही बोलायचं; पण नंतर काहीच करायचं नाही, असं भाजपच पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे थोरात यांनी म्हटले आहे .